Friday, December 1, 2006

बोधकथा...

मला आयुष्यात मिळालेले वक्त्रुत्व स्पर्धेतले एकमेव बक्षीस ह्या गोष्टीमुळे मिळाले. (ईयत्ता ६ वी मधे. तेही ३ रे बक्षीस). तेही वक्त्रुत्व गुणांपेक्षा ह्या गोष्तीतील भाबडेपणाला मिळाले असावे. -:)
------------------------------------------------------------------------------------------------------------
आटपाट नगर होते. तिथे एक राजा राज्य करत होता. त्याने आजूबाजूची लहान मोठी राज्ये जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला होता.
राज्याच्या तिजोरीत भरपूर खजिना आणि धान्यकोठारात भरपूर धान्य होते. एकूणच राज्यकारभार चांगला चालला होता. पण तरीही राजाला मन:स्वास्थ्य नव्हते.
आपण कुठे तरी अपुरे पडत आहोत असे त्याला वाटायचे.
एके रात्री तो असाच वेष बदलून राज्यात फेरफटका मारायला निघाला. जाता जाता त्याला एक झोपडी दिसली. त्या झोपडीतून त्याला गाणे गुणगुणण्याचा आणि काम करत असल्याचा आवाज ऐकु आला. इतक्या रात्री कोणी तरी तरी काम करत आहे हे पाहून राजाची उत्सुकता चाळवली गेली. तो झोपडीपाशी गेला आणि आत डोकावून पाहू लागला.
आत एक लोहार आपले काम करत होता. राजाला बघताच तो काम करायचे थांबला. त्याने राजाला ओळखले नाही पण तरीही कोणी एक वाटसरु आपल्या दाराशी आला हे पाहून त्याने राजाला बसायला पाट पुढे केला आणि प्यायला पाणी दिले. तो काम करुन दमल्याचे त्याचा चेहरा स्पष्टपणे दाखवत होता पण तरीही तो आनंदी आणि समाधानी वाटत होता.
इकडचे तिकडचे प्रश्न न विचारता राजाने त्याला थेट प्रश्न विचारला, "तुम्ही खूप आनंदी दिसता. ह्याचे कारण काय?" लोहार म्हणाला, "असेलही कदाचीत. ह्याच्याबद्दल विचार करायला मला कधी वेळच मिळाला नाही." त्याच्या इतक्या बेफ़िकिर आणि निर्विकार पणाचे राजाला खूप वैषम्य वाटले. तो म्हणाला, "नक्कीच तुम्ही खूप पैसे मिळवत असणार, खूप नावलौकीक कमावत असणार. अगदीच काही नाही तर निदान देवपूजा आणि दानधर्म तरी भरपूर करत असणार." लोहार उत्तरला, "भल्या माणसा, तू आत्ता जाणीव करून दिलीस तेव्हा मला जाणवले की मी ह्यातले काहीच करत नाही. खर सांगायचे तर हे सगळे करण्यासाठी माझ्याकडे वेळ आणि पैसा दोन्ही नाही. पूर्ण दिवस मी राब-राब राबतो आणि मिळेल तो सगळा पैसा खर्च करतो. मग मी हे सर्व कधी आणि कुठल्या पैशानी करणार?"
राजा चक्रावला. त्याने विचारले, "म्हणजे. तू मिळवतोस किती आणि त्या पैशाचे तू करतोस तरी काय?" लोहार म्हणाला, "मी जे काही मिळवतो त्याचे ४ भाग करतो. एक भाग स्वत: खातो, एक भाग कर्ज फेडतो, एक भाग उधार देतो आणि एक भाग नदीत फेकतो. बस्स."
राजा उतावळे पणाने म्हणला, "अरे बाबा असे कोड्यात बोलू नकोस. नीट स्पष्टपणे सांग याचा अर्थ."
लोहार म्हणला, "मी एक भाग खातो म्हणजे एक भाग स्वत: वर, माझ्या पत्नीवर खर्च करतो. एक भाग कर्ज फेडतो म्हणजे तो भाग माझ्या आई-वडिलांवर खर्च करतो आणि त्यांचे उपकार माझ्या परीने फेडण्याचा प्रयत्न करतो. एक भाग उधार देतो म्हणजे माझ्या मुलावर खर्च करतो. म्हातारपणी तो माझी काळजी घेईल हीच त्या मागची स्वार्थी भावना आहे. आणि राहिलेला शेवटचा भाग मी नदीत फेकतो. म्हणजे माझ्या मुलीवर खर्च करतो. आज ना उद्या ती सासरी जाणार. तोवर तिला सांभाळणे हे माझे कर्तव्य आहे. त्यानंतर माझ्या तिच्याकडून कसल्याही अपेक्षा नाहीत. हे सगळे करता करता आपण म्हणालात त्या गोष्टींचा विचार करायला मला वेळच मिळत नाही"
राजा काय समजायचे ते समजला. तो तिथून उठला आणि निमूटपणे निघून गेला.
मन:शांती मिळावी म्हणून काय करावे असा प्रश्न आता त्याला पडला नव्हता.

No comments:

Post a Comment