रामदासांचा आणि माझा शेवटचा संबंध हा प्राथमिक शाळेत ’मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा इतकाच मर्यादित होता. माझ्या आयुष्यातले दुसरेवसरे (पहिलेवहिले च्या धर्तीवर) बक्षीस हे ’मनाचे श्लोक’ स्पर्धेतले होते. ज्याबद्दल मला ’रंगीत खडूची पेटी’ बक्षीस मिळाली होती...(ज्यातले रंग ’ढ’ दर्जाचे होते...आमच्या चित्रांसारखे)
असो...हे थोडे (जास्तच) विषयांतर झाले. तर सांगायचा मुद्दा हा की...लहानपणी मनाचे श्लोक किंवा ईतर श्लोक, ओवी, अभंग असे वाचनात यायचे. त्यावरुन बऱ्याच गंमतीजंमती पण व्हायच्या...
म्हणजे - जे का रंजले गांजले च्या ऐवजी ’जे कारंजे गंजले’ असे काही तरी...एकदा संत चोखा मेळा यांच्या ’चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा’ ही ओळ एकाने चुकून गडबडीत ’चोखा म्हणे माझा भाव कमी आहे’ अशी वाचली...आणि मग मास्तर असा हात सैल करायचा ’मणिकांचन योग’ कसा सोडतील...