Saturday, April 24, 2010

साहित्य संमेलन – मला दिसले तसे…




¶मागच्या महिन्यात पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊन आलो तेव्हापासूनच त्याबद्दल लिहायचे होते, लिहायला सुरुवातही केली होती पण काही ना काही कारणामुळे पूर्ण करणे राहून गेले होते...



¶पुण्यात जे काही होते ते अखिल भारतीयच असते. आमच्या घराजवळ ’अखिल भारतीय शनिवार पेठ नवरात्र उत्सव मंडळ’ आहे (त्या नवरात्र मंडळाचा गणपती उत्सव धूमधडाक्यात साजरा होतो! (??) ही अजून एक गंमत). मी साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी गेलो. आधीच्या २ दिवसांचे माहिती नाही पण समारोपाला अमिताभ बच्चन येणार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. मी संध्याकाळी ५:३० च्या सुमारास तिथे पोचलो.



¶पुस्तक प्रदर्शनात जाता जाता वाटेत कवि-संमेलनाच्या ठिकाणी थोडावेळ थांबलो. तिथे श्रोत्यांपेक्षा स्टेजवर कविता साजरी करायला जमलेल्या कवींची गर्दी जास्त होती. निमंत्रितांचे मुख्य कविसंमेलन आधीच होऊन गेले होते. त्यामुळे हे म्हणजे नवीन आणि होतकरु कवींना संधी (किंवा ’उपेक्षितांना संधी’) देण्यासाठी आयोजित केलेले कवीसंमेलन होते. (एवीतेवी मांडव घातलेलाच आहे, त्याचे भाडे द्यावे लागणारच...मग त्यात चार टाळकी आपली (रड)गाणी गात बसले तर बसु दे की...’ - आयोजकांचा ’आतला’ आवाज!)


¶त्यामुळे एकुणच वातावरण मंगल कार्यालयात मुख्य कार्य झाल्यावर मोठ्ठ्या सजवलेल्या खुर्च्या, टेबलं (टेबल या इंग्रजी शब्दाचे हे मराठी अनेकवचन आहे), फुलांच्या माळा इ. भोवती लहान पोरं-टोरं खेळत बसतात ना तसला प्रकार होता. त्याला काहिही नियोजन नाही, समन्वय नाही. मी आत जायचा धोका पत्करला नाही. एकटा ’रसिक’ असा बुभुक्षित कवींच्या कळपाला एकटा सामोरा कसा जाणार? तसेही कवी संभाव्य ’गिऱ्हाईक’ ओळखून त्यांना बेसावधपणे गाठण्यात पटाईत असतात. (अपवाद वकीलांचा...त्यांच्याहून पटाईत कोणीच नसते!), त्यातून हे शिकाऊ (आणि बरेचसे टाकाऊ कवी)...


¶तिथून जवळच दुसऱ्या तंबूत ’परिसंवाद’ चालला होता. (परिसंवाद ह्या विषयावर सविस्तर पुढच्या भागात लिहीणारच आहे...) विषय होता: ’सातासमुद्रापलिकडील मराठी लेखन’. भाग घेणाऱ्या (इंपोर्टेड) साहित्यिकांत ३ अमेरिकेचे होते, एक कॆनडा, एक सौदी अरेबिया आणि एक सिंगापूर! सूत्रसंचालन मात्र पुण्यातल्याच सूत्रसंचालकाकडे होते...काही झाले तरी या ना प्रकारे सगळी ’सूत्रे’ आपल्याकडे ठेवायची हे पुण्यातल्या लोकांना बरोबर जमते. बाकीच्या देशातले मराठी तिथे का नव्हते कुणास ठाऊक? बहुदा लेखक ’सातासमुद्रापलिकडील...’ असा उल्लेख असल्यामुळे (सूत्रसंचालक धरून) सातच माणसे असावीत किंवा त्यांच्याकडे बरोब्बर सातच खुर्च्या असाव्यात. असो.  दुपारी २:३०-३ ची वेळ आणि तंबूतला उकाडा यामुळे आयात केलेल्या पाहुण्याचा मेक-अप उतरायला लागला होता...पण उत्साह मात्र भक्कम होता!


¶ह्या विषयात चर्चा किंवा परिसंवाद करण्यासारखे काय होते मला कळले नाही त्यामुळे ते मुळात एका उंच स्टेजवर चढून, खुर्च्यांमधे अवघडून का बसले आहेत, आणि अत्यंत निरर्थक बडबड का करत आहेत तेच मला कळले नाही. त्यामुळे मी तिथे न रेंगाळता ग्रंथप्रदर्शनाकडे वळलो.


¶ग्रंथप्रदर्शनात ’ग्रंथ’ सोडून इतर गोष्टींचाच भरणा जास्त होता. पुण्यात तसे सतत ग्रंथप्रदर्शन चालूच असते त्यामुळे वेगळे ग्रंथदालन कशासाठी ते कळेना? खूप जास्त स्टॊल आहेत हे वैशिष्ट्य आहे असे मानले तर एक तर सगळ्या स्टॊल मधली पुस्तके बरीचशी सारखीच होती (कारण ते वेगवेगळ्या प्रकाशकांचे स्टॊल नव्हते, तर वेगवेगळ्या वितरकांचे आणि विक्रेत्यांचे स्टॊल होते, बस्स), आणि दुसरे म्हणजे इतके स्टॊल एका जागी असणे हेही काही विशेष नाही. ’अप्पा बळवंत चौक, पुणे’ इथे असे कायम स्वरूपी ग्रंथदालन आहे.


¶सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष ’ग्रंथ’ या विषयात लोकांना जास्त रस नव्हता. एकूणच वेगवेगळ्या स्टॊलवरची गर्दी पाहिली की लगेच माझे म्हणणे पटेल.


¶सगळ्यात जास्त गर्दी अर्थातच खाण्या-पिण्याच्या ठिकाणी होती. पुण्यात कुठही गल्लीबोळात गेलात तरी प्रत्येक खाण्याची जागा धूमधडाक्यात चालत असलेली दिसेल. मग साहित्य संमेलन तरी अपवाद का असावा? साहित्यसंमेलनाला सहकुटुंब आलेले लोक जत्रा, मेळा, सर्कस किंवा नाटक/चित्रपट सारख्या करमणूकीच्या ठिकाणी गेल्या सारखे ५-१० मि. पुस्तके चाळून यथेच्छ भेळ, पाणी-पूरी, सामोसा हादडत होते!


¶सी-डॆक या संस्थेच्या स्टॊलमध्ये त्यांनी ’मराठी’ आणि ’संस्क्रुत’ फॊंटच्या सीडीज ठेवल्या होत्या. तिथली गर्दी पाहून मी लगेच ओळखले की ते सीडीज फुकट वाटत होते! जाता जात एक जोडप्याचे बोलणे कानावर पडले. ’अगं, कशाला आता सीडी? आपल्याकडे कॊम्प्युटर तरी आहे का?’ ’नसला म्हणून काय झालं? मिळतीये सीडी तर घेऊन ठेऊ ना आत्ता...अगदीच काही नाही तर पुढच्या महिन्यात ’अबक’ चा वाढदिवस आहे त्याला देऊ या सीडी भेट...’ (म्हणजे स्टॊल वर फुकट मिळणाऱ्या सीडीज घेऊन पुढच्या महिन्यातल्या वाढदिवसाच्या भेटवस्तुची सोय करायची असे किती दूरदर्शी आणि धोरणी ’साहित्य रसिक’ जमले होते!)


¶त्याखालोखाल गर्दी ज्या ठिकाणी होती तिथे वर काहीच नाव नव्हते त्यामुळे तिथे नक्की काय आहे अशी उत्सुकता वाटून तिथे गेलो. तर तिथे दोन कलावंत रेखाचित्र आणि अर्कचित्र रेखाटत होते. प्रत्येक चित्रासाठी रु. १०० /-  केवळ १०-१५ मि. खरोखच सुंदर अर्कचित्र ते बनवून देत होते...त्यामुळे ते बघायला आणि आपले चित्र काढून घ्यायला बरीच गर्दी जमली होती.


¶सगळ्यात जास्त गर्दीचे जवळपास ३-४ स्टॊल असे ’बिगर-साहित्यिक’ असल्यामुळे एखादा गर्दी असलेला ’साहित्यविषयक’ स्टॊल शोधावा म्हणून मी पुढे गेलो. शेवटी बऱ्यापैकी गर्दी असलेले असे ३-४ स्टॊल मला दिसले. ते अनुक्रमे भविष्य/हस्तरेषा वास्तुशास्त्र (वास्तुयंत्रासकट), ’तुमचे यश तुमच्या हाती, मी यशस्वी होणारच’ छाप सेल्फ-हेल्प पुस्तके, योगचिकित्सा/ आयुर्वेद विषयक, धार्मिक/ पौराणिक, पाकशास्त्र आणि झटपट ___ शिका (इंग्रजी, शेअर बाजार, संगणक इ.) छाप पुस्तकांचे स्टॊल असे होते.


¶थोडी फार गर्दी भाषांतरीत/ रुपांतरीत पुस्तकांसाठी किंवा वादग्रस्त पुस्तकांसाठी होती.

तुरळक गर्दी ’नेहेमीचे यशस्वी लेखक/कवी’ (पुल, वपु, संदीप खरे इ.) यांच्या पुस्तकांभोवती होती.


¶मधे एके ठिकाणी एक सुंदर तरुणी सुंदर आवाजात ’पर्यावरण आणि प्रदूषण’ या विषयावर (किंवा तसेच काही तरी असेल) अतिशय चुकीची माहिती देऊन जनजाग्रुती करत होती, तरीही तिने काही लोकांना (त्यांच्या बायका तिथे येईपर्यंत...) चांगलेच ’खिळवून’ ठेवले होते!


¶बहुतेक लोक अमिताभच्या समारोप समारंभातल्या भाषणासाठी रेंगाळत (तेच तेच पान परत परत वाचत) उभे होते...अचानक लाऊडस्पीकरवर ’आता मी अमिताभ यांना त्यांचे मनोगत व्यक्त करायची विनण्ती करतो’...असे ऐकू आले...आणि फायर आलार्म वाजावा किंवा भूकंप व्हावा तसे सगळे ’रसिक वाचक’ हाततली पुस्तके टाकून अमिताभला बघायला आणि त्याचे (हिंदीमधले) मनोगत ऐकायला पळाले.

¶एकूणच स्वरूप फारच उत्सवी होते...वर्षातले ३ दिवस मिरवणाऱ्या आणि नंतर एकही पुस्तक न वाचणाऱ्या गर्दीबरोबर मी तिथे जाणे ही माझी चूक आहे का ’साहित्य रसिक’ आणि ’संमेलन’ यांच्याकडून काही वेगळे, भरीव घडण्याची अपेक्षा करणे ही माझी चूक तेच मला समजले नाही...तेवढ्यात मला मित्राचा फोन आला - ’अरे आयपीएल मधे मुंबई इंडियन जिंकणार! हरभजन तुफान मारतोय...’


¶करमणूकच करुन घेणे हाच एक हेतू असेल तर अमिताभच्या नाटकी, खोट्या बडबडीपेक्षा (’कसं काय पुणे’ म्हणून पुढे हिंदी भाषण, हिंदी कविता...मराठी साहित्य संमेलनात...आणि अध्यक्षांपासून सगळे माना डोलावणार) मला ’लाईव्ह ऎक्शन’ वाले टी-२० जास्त आवडते...म्हणून मी लगेच घरी परतलो!


¶हे झाले सो-कॊल्ड ’रसिक वाचक’ यांच्या बाबतीतले निरीक्षण...संयोजक/ लेखक आणि एकूणच ’संमेलन’ यां बद्दलचे मत पुढच्या भागात...लवकरच...¶



~ कौस्तुभ

No comments:

Post a Comment