Saturday, July 31, 2010

आरसा:



आरसा:
ते पत्र आल्यापासून श्रीनिवासच्या मनाची शांतता पार ढळली होती. गीता गेल्यापासून तो आधी अस्वस्थ होताच. आपल्याला दुःख झाले आहे, की नुसताच मनाला बधिर करून टाकणारा आघात आपल्यावर झाला आहे हे त्याला कळत नव्हते. गीताच्या निधनाने तो हादरला होता. जीवनात एक पोकळी निर्माण झाल्यासारखे त्याला वाटत होते. आज जवळ जवळ वीस वर्षे त्याने आणि गीताने एकत्र काढली होती. जनरुढीच्या विरुद्ध जाऊन ती दोघे एकत्र राहात होती. लग्नाशिवाय. पण नाते लग्नाचे असो की बिनलग्नाचे, तो संसारच होता. संसाराचे सारे बरेवाईट संदर्भ, जबाबदाऱ्या, अडचणी तिथेही होत्याच. तीच गीता अवचित घर सोडून गेल्यावर श्रीनिवासचे घर रिते होणे स्वाभाविकच होते. घर रिते झाले होते, पण मन रिते झाले होते का? श्रीनिवासला ते अजून नीटसे उमगले नव्हते. मन रिते व्हायला आधी ते भरावे लागते. गीताने त्याचे मन तसे व्यापून टाकले होते का? या प्रश्नाचे उत्तर स्वतः श्रीनिवासही देऊ शकत नव्हता. गीता त्याची इतक्या वर्षांची सहचारिणी होती; ती गेल्यावर तिच्याविषयी कोणताही अनुदार विचार मनात आणणे क्रुतघ्नपणाचे होईल असे त्याला वाटत होते. आणि तरीही तसेच विचार त्यच्या मनात येत होते. याच सुमाराला ते पत्र श्रीनिवासला आले होते आणि त्या पत्राने त्याचे मनःस्वास्थ्य नाहीसे करून टाकले होते.

एव्हाना श्रीनिवासला ते पत्र तोंडपाठ होऊन गेले होते. पत्रातला मजकूर मोजका आणि मुद्देसूद होता. पत्रातल्या ओळी श्रीनिवासला लखलखून आठवत होत्या ’...माझे पत्र तुम्हाला ढोंगीपणाचे वाटेल. असभ्यपणाचे वाटेल. तरीही गीताच्या निधनाची वार्ता कळल्यापासून तुम्हाला भेटायला यावेवे फार वाटत आहे. तुमहा माझा परिचय कधीच झाला नाही. तसा कधी योगही आला नाही. मी आणि गीता विभक्त झाल्यावर मग तुम्ही तिच्या जीवनात आलात. माझा तुमच्यावर मुळीच राग नाही. उलट गीताच्या जीवनाचे तारू कुठल्या कुठे भडकले असते, तिला तुमचा आधार लाभला याबद्दल मला बरेच वाटत होते. हे मी मनापासून लिहीत आहे. आज माझ्या मनात गीताबद्दलही रोष नाही. मी माझ्या साध्या सरळ संसारात सुखी आहे...तुम्हाला भेटावेसे मात्र फार फार वाटते...मी तुमच्या भेटीला येऊ का? तुम्ही नकार दिला तरीही मला नवल वाटणार नाही. तुमचा होकार कळला, तर मात्र फार समाधान वाटेल येवढेच सांगतो...अनुकूल उत्तराची वाट बघत आहे. आपला, वामन वालावरकर.’

पत्र आले आणि श्रीनिवास चक्राऊन गेला. वामन वालावरकर. ते नावही आता त्याच्या स्मरणातून पुसून गेले होते. गीताने कधी तरी आपल्या या पहिल्या पतीचे नाव त्याला सांगितलेले असणारच. पण तो ते खरेच विसरून गेला होता. आता ते नाव पत्रात वाचताना त्याला विचित्र वाटले. किती गद्य, व्यवहारी नाव वाटत होते ते. एखाद्या कापडाच्या, नाहीतर किराणा मालाच्या दुकानदाराचे नाव असावे तसे ते नाव होते.  गीता आपल्या ह्या पतीबद्दल क्वचितच काही बोले. कसा असेल हा माणूस? त्याचे रंगरुप, त्याचा स्वभाव त्याची जीवनसरणी कशी असेल? आज त्याची मनःस्थिती काय असेल? गीताच्या निधनाच्या वार्तेने तो दुखीः झाला असेल का? गीताबद्दलच्या त्याच्या भावना तरी काय होत्या?

एकाएकी या वामन वालावरकरला भेटण्याची विलक्षण उत्सुकता श्रीनिवासला वाटू लागली? तसे अपराधी वाटन्यासारखे श्रेनिवासने कुठे काय केले होते? गीता आपल्या वैवाहीक जीवनात रमून गेली असताना श्रीनिवासने जर तिला आपल्या मोहात गुंतवले असते, तर त्याला अपराध्यागत वाटण्याचा संभव होता. पण तसे काहीच त्याने केले नव्हते. गीता आणि तो एकत्र आली तेव्हा, या पहिल्या नात्याचे सारे बंध तिच्या लेखी तुटूनच गेले होते. त्या धगधगत्या अंगाराची नुसती राखसुद्धा तिच्या मनात उरली नव्हती. मग आता या वामन वालावरकरला भेटायला काय हरकत होती? वालावरकराने जे लिहीले ते मनापासून लिहीले होते. अगदी प्रामाणिकपणे सौजन्यपूर्ण रीतीने तो श्रीनिवासला भेटू इच्छित होता. त्याला कदाचित श्रीनिवासचे सांत्वन करावयाचे असेल, कदाचित गीताबद्दल बोलण्याची त्याला अनावर इच्छा झाली असेल. कदाचित...कदाचित...

श्रीनिवासला पुढे विचारच करता येईना. एकदा त्याला वाटले, या अनोळखी परक्या माणसाला सरळ नकार द्यावा. गीता गेली. सारे संपले. आता तिच्या पहिल्या पतीला इतक्या वर्षांनंतर भेटण्यात अर्थ तरी काय होता? आणि या भेटीतून निष्पन्न तरी काय होणार होते? तरीही वामन वालावरकरच्या पत्रातून ओसंडणारी मनाची सरलता, रुजुता त्याला कुठे तरी आतून खरेपणाने जाणवत होती. एकाएकी त्याने आपल्या मनाशी निर्णय घेऊन टाकला आणि आपली चलबिचल, संशय वाढण्याच्या आतच त्याने वालावरकरला आपल्या भेटीला यावयाची संमती दिली. संमतीचे पत्र धाडले आणि श्रीनिवास एकदम निश्चिंत झाला. त्याची चलबिचल संपली आणि वालावरकराच्या भेटीची तो शांत मनाने वाट बघु लागला.

भेटीचा दिवस ठरला. श्रीनिवास एका बड्या, श्रीमंती थाटाच्या फर्ममध्ये भारी पगारावर नोकरी करीत होता. भेटीचा दिवस ठरला, तेव्हा त्याने त्या दिवसापुरती रजा घेतली. नोकरालाअ आवश्यक त्या सूचना देऊन ठेवल्या. वालावरकरला जेवायला बोलवावे असेही त्याला वाटले. पण नाही म्हटले तरी, वालावरकर हा सांत्वनाच्या भूमिकेवरून भेटायला येणार होता. अशा वेळी जेवायची सूचना त्याला करणे फारच वाईट दिसले असते. श्रीनिवासने कॊफी, बिस्किटे आणि फळे एवढाच बेत ठरवला. वालावरकराच्या भेटीच्या कल्पनेने तो अस्वस्थ झाला होता. खरे म्हणजे श्रीनिवास बुद्धीमान होता. चतुर होता. व्यवसायाच्या निमित्ताने तो देशभर हिंडला होता. एतकेच नाही तर, परदेशातही एकदा-दोनदा जाऊन आला होता. वालावरकरचा व्यवसाय काय होता याची त्याला कल्पना नव्हती. पण श्रीनिवासच्या तुलनेने तो खूपच सामान्य परिस्थितीत दिवस कंठीत असला पाहीजे याबद्दल श्रीनिवासला शंका नव्हती. त्याच्या भेटीच्या कल्पनेने गोंधळण्याचे, अस्वस्थ होण्याचे श्रीनिवासला कारण नव्हती. तरीही या भेटीच्या बाबतीत त्याला विचित्र वाटत होते एवढे मात्र खरे. व्यवसायाच्या निमित्ताने कितीतरी परक्या, अनोळखी माणसांना भेटण्याचा श्रीनिवासवर अनेकदा प्रसंग येई. पण वालावरकरची भेट ही तशा प्रकारच्या भेटींत बसणारी नव्हती. तो अनोळखी होता. तरीही ओळखीचा होता. म्हटले तर त्याच्याशी कसलेही नाते नव्हते. आणि म्हटले तर एका विलक्षण, अनाकलनीय नात्याने ते दोघेजण जोडलेले होते. जग सोडून गेलेल्या गीतापासून या नात्याचा उगम  होता. आणि त्या एका स्त्रीच्या नात्यानं परस्परांशी निगडीत झालेले हे दोन पुरूष तिच्या म्रुत्युनंतर आता अचानक एकमेकांना भेटणार होते.

भेटीचा दिवस ठरलेला होताच. त्या दिवशी संध्याकाळी बरोबर सहाच्या ठोक्याला दारावरची बेल वाजली. श्रीनिवासने गड्याला बाहेर पाठवून दिले होते. या भेटीच्या वेळी तिसरे कुणीही जवळ असू नये असे त्याला - का कोण जाणे - मनातून वाटत होते. बेल वाजताच त्याने जऊन स्वतः दार उघडले. दाराबाहेर एक मध्यमवयीन, प्रौढतेकडे झुकणारा, चेहेऱ्यावर अवघडलेपण धारण केलेला पुरूष होता. श्रीनिवासने त्याला पाहून ओळखीचे हास्य केले आणि दार पुरते उघडीत, स्वतः बाजूला होऊन तो त्याला म्हणाला,
’या, आत या ना.’
वालावरकर आत आला. तरिही संकोचाने तो काही वेळ उभाच राहिला. अस्वस्थ नजरेनं श्रीनिवास सुसज्ज, सुंदर दिवाणखान्याकडे पाहू लागला. अशा ठिकाणी जाण्याचा त्याला फार क्वचित प्रसंग येत असावा, हे त्याच्या एकूण हालचालींवरून, आविर्भावांवरून सहजच ध्यानी येत होते. श्रीनिवासचे मन करुणतेने, सहानभुतीने भरुन गेले. त्याने त्याला हाताशी धरून कोचावर आणून बसवले आणि सौम्य हसून तो त्याला म्हणाला,
’बसा असे आरामशीर. घर ंइलायला त्रास नाही ना पडला फारसा?’
’छे!’ वालावरकरही जरासा हसला ’तुम्ही पत्त व्यवस्थित कळवला होता. शिवाय फोनवरून आधी बोलणही झालं होतं. त्यामुळे तशी काही अडचण जाणवली नाही.’ तो म्हणाला.
’मग ठीक आहे.’ श्रीनिवास बोलला.

पुनः काही वेळ दिवाणखान्यात विचित्र शांतता पसरली. त्या शांततेचे दडपण त्या दोघांही पुरुषांच्या मनावर आल्या सारखे झाले. पण त्या निःशब्द वातावरणात दोघेही एकमेकांना प्रथमच नीट न्याआळून बघत होते. स्वतःशी दुसऱ्याचा वेध घेत होते. त्याच्याविषयी मनातल्या मनात अंदाज बांधत होते.
श्रीनिवासने वालावलकरह्च्या ध्यानी येणार नाही अशा पद्धतीने, पण सराईतपणे त्याच्याकडे बघून घेतले. दहा माणसांत सहज विसरायला होईल इतका साधा, सामान्य , व्यक्तीत्वहीन चेहरा. डोक्याला पडू लागलेले टक्कल आणि कानशीलांवरून मागे हटत चाललेले करडे केस. थकलेले श्रांत डोळे. चेहऱ्यावर ओढग्रस्त जीवनाने ठळक ओढलेल्या रेषा. वालावरकरच्या साऱ्या मुद्रेत आकर्षक होते ते त्याचे हसू. त्या हसण्यात एक निर्मळ स्वाभाविकता होती. दुसऱ्याच्या मनात स्वतःबद्दल जवळीक, विश्वास निर्माण करण्याची शक्ती होती.

एकीकडे श्रीनिवास वालावलकरचे असे निरीक्षण करीत असता, वालावरकरही श्रीनिवासला जाणवणार नाही अशा बेताने त्याच्या मुद्रेचा, व्यक्तित्वाचा वेध घेत होताच. श्रीनिवासचे व्यक्तीमत्व आक्रमक, प्रभावी होते. चेहेरा देखणा नसला तरी, प्रथमदर्शनी दुसऱ्यावर ठसा उमटवणारा होता. हालचालीत यशस्वी धंदेवाल्या माणसाचा ठाम आत्मविश्वास होता. आणि या साऱ्यांतून पुनः एक हळवे, संवेदनशील असे मन डोकावत होते. वालावरकरला वाटले, गीतासारख्या मनस्वी स्त्रीला आपण पुरे पडलो नसतो. तिने श्रीनिवासला आपला जीवनसहचर बनवले हेच योग्य आहे. साऱ्या घटनेत त्याला एक न्याय वाटला. सुसंगती जाणवली. गीताबद्दल आता त्याच्या मनात काहीच अढी उरली नव्हती. श्रीनिवासबद्दल मनाच्या तळाशी चुकुन कुठे काही कडवट भाव रेंगाळत असेल तर, तोही श्रीनिवासला प्रत्यक्ष बघताना पार ओसरुन गेला. थोडक्यात सांगायचे तर, श्रीनिवासविषयी त्याचे फारच अनुकूल मत झाले.
दिवाणखान्यातली शांतता आता असह्य होऊ लागली दोघांनाही एकमेकांशी बोलावेसे वाटले. पण सुरुवात कुणी करायची, कशी करायची हा प्रश्नच होता. शेवटी वालावरकरच म्हणाला,
’गीताला काय झालं होतं?’ प्रश्न विचारताच आपण फार औपचारीक प्रारंभ केला आहे असे त्याला जाणवले. पण यापेक्षा वेगळे काय बोलावे, कसे बोलावे ते त्यालाही कळेना.
’तसं नीट काही कळलंच नाही अखेरपर्यंत.’ श्रीनिवास सांगू लागला, ’गेली २ वर्षं तिच्या तब्येतीच्या बारीकसारीक तक्रारी चालूच होत्या. मग तिला अन्नच जाईनासं झाल, वजन उतरलं. खंगत गेली ती आणि शेवटी पंधरावीस दिवसांच्या तापाचं नुसतं निमित्त झालं...गेली. काहीशी अचानकच गेली म्हटलं तरी चालेल.’
श्रीनिवासलाही बोलताना विचित्र वाटत होते. वीस वर्षे आपल्याशी संसार केलेल्या गीताबद्दल बोलताना अगदी त्रयस्थ, अपरिचित व्यक्तीबद्दल बोलावे तशा कोरडेपणाने, वस्तुनिष्ठ द्रुष्टीकोनातून आपण बोलत आहोत असे त्याला वाटले. पण जो जिव्हाळा पोटातूनच जाणवत नव्हता तो ओंठात कसा आणायचा हेच त्याला कळेना. कदचित वालावरकरसमोर याहून अधीक भावनावश होण्याचा त्याला खोल कुठे तरी संकोचही वाटत असावा. काही असो. एकूण बोलणे फारच वरवरच्या पातळीवर, उथळपणे चालले आहे असे त्याला वाटले. आणि तरीही याहून वेगळे कसे बोलावे हे त्याला उमगत नव्हते.
’मी गीताला बरीच वर्षं बघितलीच नाही.’ वालावरकर बोलू लागला.  ’एकदा आमच्या मुलींच्या शाळेत कसलंसं भाषण द्यायला आली होती ती. माझ्या मुलींपासून तिचं-माझं नातं मी अन माझ्या बायकोनंही लपवून ठेवलंय कटाक्षानं. पण मुलींना ती आवडली असावी. तिच्याबद्दल बरेच चांगलं बोलत होत्या त्या.’

वालावलकर क्षणभर थबकला. म्ग पुनः जरा अवघडून तो म्हणाला, ’तशी कुठल्या तरी एका महिला मंडळात, माझ्या पत्नीची अन तिचीही भेट झाली होती. त्यावेळी तिनं आवर्जून माझ्या घरची, माझी, मुलांची चौकशी केली होती. आम्ही दोघं भांडून वेगळे झालो, त्यावेळी दोघांचीही मने एकमेकांबद्दल कडवट होती. असावीत...आता इतकं जुनं काही आठवतदेखील नाही. पण निदान नंतर तरी गीताच्या मनात वैषम्य राहिलं नसावं माझ्याविषयी. माझ्या मनातही फारसा वाकुडपणा नसावा. आता तर ते सारच फार पुसून गेलय. म्हणूनच तुम्हाला भेटताना अगदी निःशंक, निर्मळ मनानं मी आलो आहे. खरंच सांगतो, तुम्ही भेटायचं कबूल केलंत हा मोठेपणा आहे तुमच्या मनाचा. दुसऱ्या एखाद्यानं सरळ ’नाही’ म्हटलं असत. खरं तर, आपला संबंध तरी काय? तुमचे मी खरेच आभार मानले पाहिजेत.’
श्रीनिवासला फार अवघडल्यागत झाले. तो चटकन म्हणाला, ’अहो भलतंच काय? आभाराची कसली भाषा बोलता? आभारच मानायचे झाले तर, मी ते तुमचे मानायला हवेत. तुम्ही आवर्जून माझ्या दुःखात मला भेटायला आलात. काही नातं मनानं मानलंत, गीताचे आठवण ठेवलीत, तुमचाच मोठेपणा आहे हा.’
’मोठेपणाची गोष्ट सोडा हो’ वालावरकर म्हणाला, ’खरं सांगू का? गीता गेली आणि वाटलं, आत्ताच तुम्हाला भेटायला हवं. एकमेकांची काही खरी ओळख पटली तर ती आत्ताच पटेल. ती ओळख पटवून घ्यायची उत्कट इच्छा झाली येवढं मात्र सांगतो. कारण ते अगदी खरं आहे.’

-संभाषण गती घेत होते. स्वतःच्याही नकळत, ते दोघे अनोळखी पुरुश एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. परस्परांच्या अंतरंगाचा ठाव घेत होते. काही दुवे जुळत होते. श्रीनिवासला अचानक आठवण झाली. आल्यापासून या पाहुण्याला आपण चहापाणी विचारले नाही. तो म्हणाला,
’तुम्ही कॊफी घ्याल ना?’
बोलता बोलता त्याला शंका आली, या माणसाने आपल्याकडे काहीच घ्यायला नकार दिला तर? गीताच्या निधनाच्या निमित्ताने तो घरी आला होता हे एक कारण होतेच. पण कदचित त्याहूनही एखाद्या वेगळ्या अंतःप्रेरणेने, काही अनामिक गूढ जाणिवेने त्याला आपल्या घरी काही खावे-प्यावेसे वाटणार नाही. तसे झाले तर? आपल्याला राग येईल? वाईट वाटेल? समाधान वाटेल?
पण हे सारे विचार श्रीनिवासच्या मनात आले असतील तोच, वालावलकर हसून म्हणाला,
’खरं तर, आज मी कॊफी वगैरे घ्यायला नकार द्यायला हवा. पण ऒफीसातून सरळ इकडंच आलोय मी. कॊफीची फार गरज आहे बुवा. खायला देखील चालेल सोबत काहीतरी.’
श्रीनिवासच्या मनावरचे दडपण एकदम दूर झाले. वालावलकरच्या सरळ, मुग्धपणाने त्याचा ठावच घेतला. तो भरकन स्वैंपाकघरात गेला आणि कॊफी तयार करून घेऊन बाहेर घेऊन आला. बरोबर बिस्किटे होती, फळे होती. इतकेच नव्हे तर, घरातल्या डब्यांतून मिळालेले आणखी काही खाण्याचे पदार्थंही त्याने बशा भरून आणले होते. टीपॊयवर ते सारे पदार्थ ठेवीत तो मनःपूर्वक म्हणाला,
’या वालावलकरसाहेब, मलाही भूक लागली आहे. अगदी संकोच न करता घ्या बघू सारं काही’
वालावलकरने एक-दोन पदार्थ तोंडात टाकले आणि गरम कॊफीचा घोट घेऊन त्याने समाधानाचा, त्रुप्तीचा निःश्वास सोडला. मग अचानक त्याने श्रीनिवासकडे सरळ रोखून पाहिले आणि तो म्हणाला,
’एक विचित्र प्रश्न विचारु?’
श्रीनिवास दचकला. कॊफीचा कप दूर करून प्रश्नार्थक नजरेने तो वालावलकरकडे बघत राहिला.
’माफ करा, खासगी प्रश्न विचारतो आहे. पण गीता आणि तुम्ही सुखात होता का? विशेषतः गीता सुखी झाली का?’
श्रीनिवासला वालावरकरच्या प्रश्नाचा राग आला. पण रागावता रागावताच तो एकदम अंतर्मूख झाला. वालावलकरच्या प्रश्नात, आपणाला अपमानकारक असे काही नाही, हे कसे कोण जाणे-त्याच्या ध्यानात आले. त्याने भुवया आकुंचित केल्या. काहीसे आठवण्याचा प्रयत्न केला आणि तो म्हणाला,
’गीता सुखी होती की नाही सांगणं अवघड आहे. तशी ती समाधानी दिसायची. पण, खरं सांगू? तशी गीता मला फारशी कधी समजलीच नाही. थांग नाही लागला तिचा मला कधी.’
’एकूण, गीता कधी बदललीच नाही म्हणायची’ वालावलकर स्वतःशीच पुटपुटावे तसा बोलला.
’म्हणजे काय? ती बदलली नाही असं कोणत्या अर्थानं म्हणता तुम्ही?’ श्रीनिवासने कुतूहलाने विचारले.
’तुम्ही विचारताच आहात तर सांगतो सारं काही’ वालावलकर म्हणाला. त्याने भुवया आकुंचित केल्या. जुने काही आठवण्याचा तो प्रयत्न करीत असावा.

क्षणभराने कपाळावरुन हात चोळीत तो म्हणाला,
’कसं सांगू? सांगणं अवघड आहे मोठं. गीताचं नि माझं लग्न झालं ते घरच्या माणसांच्या संमतीनं. तेव्हा ती लहान होती. मीही पोरसवदा होतो. भातुकलीचा खेळ असावा, तसा संसार होता आमचा. आम्ही घर मांडलं. मला पैसे कमी मिळत. गीता नीटशी कधी उमलली नाही. फुलली नाही. ती अस्वस्थ दिसे. तिला सतत काही तरी निराळेच हवे असायचे. काय ते मला कळलं नाही. तिलाही कळलं नाही, ती शिकू लागली. बी.ए. झाली. आमचा पैसा वाढला. एक मूल झालं. गेलं. पुढे पुढे आमचं बोलणंच संपलं. तसं भांडण नव्हतं, तंटा नव्हता, काही नव्हतं. मला वाट्तं, ती एकूण माझ्या घरालाच कंटाळली. एक दिवस सरळ माहेरी निघून गेली. मीही भांडणतंटा केला नाही. तिला मोकळीक हवी होती. ती मी तिला दिली. मी माझ्या वेगळ्या मार्गाला लागलो. संपलं!’
वालावरकर बोलायचा थांबला. किती निर्विकारपणे बोलत होता तो. पण त्यातून श्रीनिवासला गीताची एक नवी ओळख पटत गेली. कशी होती गीता? खरे म्हणजे, त्यालाही ते नीटसे उमगले नव्हते. गीताने पुढे शाळेत नोकरी धरली होती. कुठल्याशा एका लग्नसमारंभात त्याची व गीताची ओळख झाली. प्रथमदर्शनी ती त्याला आवडली. मग भेटी, फिरणे, चारदोन सिनेमे. त्याने तिला मागणी घातली. तिने आपला पूर्वव्रुत्तांत त्याला सांगितला होता. काहीच लपवून ठेवले नव्हते. गीताचे पूर्वी एक लग्न झाले होती यात श्रीनिवासला काही आक्षेपार्ह वाटले नाही. त्याने तिच्याशी लग्न केले. आपल्या व्यवसायात तो वर वर चढत गेला. घरात पैसा आला. अनेक सुखसोयी आल्या. संसार झाला. पण-संसार झाला इतकेच. यापेक्षा जास्त त्याला गीता खरोखरच उमगली नव्हती...

- दिवाणखान्यातल्या शांततेची आता कुठे त्याला जाणीव झाली. वालावरकरचे बोलून संपले होते. आता श्रीनिवासने काही बोलावे असे त्याला वाटत असणार. त्याच अपेक्षेने तो श्रीनिवासकडे बघत होता. पण काय बोलावे ते श्रीनिवासला उमगत नव्हते. तो हताशपणे किंचित हसला आणि वालावरकरला म्हणाला,
’तुमचा हेवा वाटतो मला. किती थोडक्यात तुम्ही तुमच्या संसाराचा आढावा घेतला. पण मला तसं काहीच सांगता येत नाही. येवढंच सांगतो की, मलाही गीता कधी कळली नाही. ती तशी हसे-खेळे. आनंदानं वागे. निदान आनंदात असल्यासारखी दिसे. पण आम्हा दोघांत अलिप्ततेचा एक पडदा कायम राहिला. गीताला मूल हवं होतं का? तेही मला कळलं नाही, तशी तिनं कधी असोशीही दाखवली नाही. ती त्रुप्तही नव्हती. तिनं जीव टाकून कधी माझ्यावर प्रेमही केलं नाही. तिनं माझ्याकडे कधी काही मागितलंही नाही. जीव भरून मला कधी काही दिलंही नाही. आता ती गेली. सारं संपलं. घर रितं झालं पण मन रितं झालं का? कळत नाही मला. कारण गीतानं माझं मन कधी भरूनही टाकलं नाही. या प्रकाराचा उलगडाच होत नाही मला. माफ करा. मी फार बोलतो आहे. कदाचित अप्रस्तुतही बोलत असेन. पण मला वाटतं, मी जे बोलतो आहे त्याचा अर्थं तुम्हीच जाणू शकाल.’
वालावरकर क्षणभर स्तब्ध राहीला. मग तो म्हणाला, ’मला वाटतं, गीता स्वयंपूर्ण होती. स्वतःच ती संतुष्ट होती. तिला कधी कुणाची गरजच भासली नसावी. तिनं दोन लग्नं केली. दोन संसार थाटले. पण मला वाटतं, तिला त्याची आवशकताच नसेल. अशा स्त्रीया असतात का? कुणास ठाऊक! निदान गीता तशी होती. असावी.’
’तिला नेमकं काय हवं होतं, मला कधीच कळलं नाही.’ श्रीनिवास स्वतःशीच बोलावा तसे बोलला.
’मलाही समजलं नाही ते.’ वालावलकर म्हणाला. मग अचानक काहीसे आठवल्यासारखे करून तो बोलला,
’गीताचा एखादा फोटो आहे? मला....मला तिला बघावसं वाटत. तुमची हरकत नसेल तर-’
’हरकत कसली त्यात?’ श्रीनिवास चटकन उठून म्हणाला, ’थांबा. बेडरूममध्ये फोटो आहे तिचा. घेऊन येतो.’
तो आत जाऊन गीताचा फोटो घेऊन आला. वालावरकरने फोटो घेतला. तो त्याकडे बघू लागला. गीतात फारसा फरक पडला नव्हता. तेच आत्ममग्न डोळे. तेच घटट मिटलेले ओठ. चेहऱ्यावर तोच परका, दूरस्थ, स्वतःत रमलेला भाव. फोटोकडे टक लावून बघून वालावरकरने एक हलका निःश्वास सोडला. मग त्याने तो फोटो दूर ठेऊन दिला.

’तुम्हाला...तुम्हाला या फोटोची एखादी प्रत हवी आहे का?’ श्रीनिवास संकोचाने म्हणाल, ’हवी असेल तर देतो.’
’छेः मला काय करायचा आहे फोटो!’ वालावलकर चटकन म्हणाला. मग अचानक एक गूढ वाक्य तो बोलला. तो म्हणाला, ’मला वाटतं, गीता हा एक आरसा होता. आरशाला स्वतःचं रंगरूप नसतं. भावना नसतात. गीता तशीच होती. त्या आरशात एकदा माझं प्रतिबिंब उमटलं. एकदा तुमचं. पण आरशाला ना त्याचं सुख, ना दुखः. आज आरसा फुटलाय. पण त्याच्या फुटलेल्या कांचात आज आपली दोघांची प्रतिबिंब एकत्र उमटली. आपण दोघे एकमेकांच्या जरा अधिक जवळ आलो...’

श्रीनिवास विस्मयाने थक्क झाला. हा सामान्य, व्यक्तीत्वहीन दिसणारा माणूस असे काही बोलेल याची त्याला कल्पनाही नव्हती. आरसा. तो गीताच्या व्यक्तीत्याच्या या नव्या अर्थाची स्वतःशी ओळख पटवून घेऊ लागला.
संध्याकाळ दाटत चालली होती. दिवाणखान्यात काळोख भरत होता. गीताचा फोटो अस्पष्ट होत होता. आणि ते दोन अनोळखी, परके पुरूष एकमेकांसमोर बसून आपणांमध्ये जडलेल्या या नव्या नात्याचा विचार करीत होते. अर्थ लावीत होते. फुटक्या आरशात उमटलेली एकमेकांची प्रतिबिंबे बघत होते.

(शांता शेळके लिखित ’अनुबंध’ ह्या कथासंग्रहातील ’आरसा’ ही कथा)

No comments:

Post a Comment